scam File Photo
नागपूर

Nagpur Cooperative Society scam: आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळा प्रकरणी सहाय्यक निबंधक निलंबित

महिनाभरात चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर ग्रामीण येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेल्या जागेची नियमबाह्य विक्री करून घोटाळा केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. त्यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर सहकार मंत्र्यांनी या प्रकरणी सादर झालेला चौकशी अहवाल चुकीचा असल्याची कबुली देत संबंधित सहाय्यक निबंधकांच्या निलंबनाची घोषणा केली.

नागपूर येथील आनंद सोसायटीमधील खसरा क्रमांक १० अ आणि १० ब या जागेवर सार्वजनिक उपक्रमासाठी ११ हजार १०७ चौरस फूट जागा आरक्षित होती. ही जागा संस्थेचे सचिव कैलास चुटे यांनी आर्थिक लाभासाठी बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आहे. ट्रान्सफॉर्मरसाठी राखीव असलेली ही जागा आर्थिक व्यवहार करून प्लॉटधारक साळुंखे यांना देण्यात आल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

बेसा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असताना सोसायटीचे सचिव चुटे यांनी दोन ले-आऊट सार्वजनिक उपक्रमासाठी आरक्षित असल्याचे दाखवले होते. मात्र, बेसा नगरपंचायत झाल्यानंतर सादर करण्यात आलेल्या नकाशात संबंधित जागा बेकायदेशीररीत्या विकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात चुकीची नोंद केल्याबद्दल बेसा येथील मुख्य अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जात असून, संबंधित उपनिबंधकांनी चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

यावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी अहवालात त्रुटी असल्याचे मान्य केले व सहाय्यक निबंधकांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच मुख्य अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची एक महिन्याच्या आत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT