नागपुरातील संविधान चौक गर्दीने फुलला Pudhari
नागपूर

Ambedkar Jayanti 2025 | महामानवाचा जन्मोत्सव, संविधान चौक गर्दीने फुलला!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti | भदंत ससाई यांचे मार्गदर्शनात धम्मज्योत मिरवणूक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - निळ्या रंगाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात इंदोरा बुद्धविहारातून डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीत हजारो धम्म बांधव सहभागी झाले. भदंत ससाई यांच्या हस्ते रविवारी रात्री बाराच्या ठोक्याला केक कापण्यात आला. यानंतर संविधान चौकात आनंदोत्सवाला उधाण आले. शहराच्या सर्वच भागातून लोक वाजत गाजत, जयघोष करीत येत असल्याने आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीने उपराजधानीचे रस्ते फुलले होते. लख्ख अशा रोषणाईने मध्यरात्री दिवस असल्याचा भास होत होता. संविधान चौक निळ्या पाखरांनी फुलला होता. (Dr Babasaheb Ambedkar Jayanti)

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्धविहार, अखिल भारतीय धम्मसेना आणि आंबेडकरी अनुयायींच्या संयुक्त वतीने निघालेल्या डॉ. आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीत उपासक, उपासिका आणि अनुयायी पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब यांचे छायाचित्र असलेले तसेच इतर देखाव्यांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. पंचशील ध्वज, निळी टोपी लक्ष वेधून घेत होती.‌‘बुद्धम शरणम्‌‍ गच्छामी। धम्मम शरणम्‌‍ गच्छामी। संघम शरणम्‌‍ गच्छामी।‌’ बुद्धवंदना म्हणत ही मिरवणूक इंदोरा चौक, कामठी मार्ग, गड्डीगोदाम, लिबर्टी टॉकीज मार्गाने संविधान चौकात पोहोचली.

भदंत ससाई यांच्या हस्ते संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदनेनंतर ससाईंनी अनुयायांना मार्गदर्शन केले. यासोबतच शहरातील प्रत्येक बुद्धविहारातून निघालेली मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत संविधान चौकात एकत्रित झाल्या. या रॅलींमध्ये हजारोंचा जनसमुदाय होता. बाबासाहेबांची जीवनगाथा सांगणाऱ्या गीतांमुळे अनुयायांमध्ये जोश संचारला होता. या मिरवणुकीत भंते धम्मप्रकाश, महानागा, प्रज्ञा बोधी, नागानंद, संघघोष, नागसेन, अश्वजित, नागवंश, मिलिंद, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, धम्मसुधा, किसा गौतमी, पुन्नीका, धम्मशीला, धम्मप्रिया, संघमित्रा, बोधी आर्या, आम्रपाली, इंदोरा बुद्धविहार कमिटीचे अमित गडपायले, भास्कर धमगाये, अजय निकोसे, विजय इंदूरकर, गणवीर, उके, गजभिये सहभागी झाले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

शहराच्या कानाकोपऱ्यातील बुद्धविहार समितीतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या. मध्यरात्री उशिरापर्यंत चारही भागातील मिरवणुका संविधान चौकात पोहोचल्या. कामठी मार्गावर लक्ष जाईल, तिकडे पंचशील ध्वज आणि निळी टोपी घातलेले धम्म बांधव दिसून येत होते. अनुयायांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी विशेष बैठक घेवून संविधान चौकासह ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT