Nagpur Ambazari Lake
नागपूर : सीताबर्डी परिसरातून घरच्यांना न सांगता निघून गेलेल्या १६ वर्षीय किशोरीने अंबाझरी तलावात उडी घेतल्याची घटना समोर आली. मात्र, तलावात तैराकीचा सराव करणाऱ्या ‘शार्क एक्वाटिक क्लब’च्या सदस्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उतरून किशोरीला सुखरूप बाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांच्या माहितीनुसार, किशोरीची प्रकृती आता सुरक्षित आहे.
किशोरी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना आत्महत्येबाबतची नोंद (सुसाईड नोट) आढळली. त्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तिचा विविध ठिकाणी शोध घेत असतानाच अंबाझरी तलावात एका मुलीने उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, अंबाझरी तलावात तैराकीचा सराव करणाऱ्या ‘शार्क एक्वाटिक क्लब’च्या सदस्यांनी किशोरीला पाण्यात उडी घेताना पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने तलावात उडी घेतली. विजय सरदार यांच्या मदतीने किशोरीला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
किशोरीचे प्राण वाचविणाऱ्या तैराकांचा सीताबर्डी पोलिस ठाण्यात विशेष सत्कार करण्यात आला. अपर पोलिस आयुक्त विनिता साहू यांनी अक्षय नरेंद्र नवले, इशांत कमलेश पांडे, राजनंदिनी राजेश समर्थ, लावण्या विकास राउत, राहुल लांजेवार आणि श्रीमथ संदीप मुळे या धाडसी तैराकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सीताबर्डी आणि अंबाझरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास राउत, पोलिस अधिकारी यशराज पोमन, पोलिस कर्मचारी प्रवीण गाढवे, रत्नाकर देवकाते आणि विजय सरदार यांचाही सत्कार करण्यात आला.