Nagpur Dr Babasaheb Ambedkar International Airport bomb threat
नागपूर : नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंगळवारी (दि.२२) पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. विमानतळ प्रशासनाला सकाळी ई-मेलद्वारे ही धमकी मिळाली. या ई-मेलमध्ये एका सिगारेटच्या बॉक्समध्ये बॉम्ब ठेवला असून, तो कधीही स्फोट होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली होती.
धमकी मिळताच सोनेगाव पोलीस स्टेशन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, तसेच सीआयएसएफ सुरक्षा यंत्रणा तातडीने सज्ज झाली. संपूर्ण विमानतळ परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. बराच वेळ तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या ई-मेलद्वारे वारंवार विमानतळाला धमक्या मिळत असून, २५ आणि २६ जून रोजीदेखील अशाच पद्धतीने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनांमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची सतत कसोटी लागते आहे.