Nagpur Aapli Bus  
नागपूर

Nagpur Aapli Bus | रक्षाबंधनानिमित्त नागपुरात बहिणींसाठी मनपाची मोफत बस सेवा

महिला व तिचे 10 वर्षाखालील अपत्यालाही एक दिवस ही सुविधा मोफत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, :  भाऊ-बहिणींच्या अतूट नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी नागपूर महानगरपालिकेने शहरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास सवलतीचा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे, शुक्रवार २८ ऑगस्टला मनपाच्या आपली बस मध्ये महिला व तिचे 10 वर्षाखालील अपत्ये आपली बस सेवेचा मोफत लाभ घेऊ शकणार आहेत.

महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती  शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेद्र (बाल्या) बोरकर, परिवहन समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे व आयुक्त डॉ. विपीन मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

मनपातर्फे संचालित आपली बसमध्ये ही सवलत लागू राहणार आहेत. 28 ऑगस्टला आपली बसच्या पहिल्या फेरीपासून तर रात्रीच्या अखेरच्या फेरीपर्यंत महिला या बसमधून मोफत प्रवास करू शकणार आहे. त्यांना कोणतेही तिकीट काढावे लागणार नाही. महिलांसोबत  त्यांचे 10 वर्षाखालील अपत्यांना सुद्धा कोणतेही  तिकीट आकारले जाणार नाही. या सोयीचा शहरातील महिलांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती श्रीमती. मंगला शशांक खेकरे, उपसभापती श्री. सुधीर उर्फ (बंडू) हरिदास राऊत, सदस्य श्री. विजय होले, श्रीमती. अर्चना पडोळे, श्रीमती. प्रमिला मथरानी, श्रीमती. मंगला मस्के, श्रीमती. रुपाली ठाकुर, श्रीमती. पुजा पाठक, श्री. शैलेश पांडे, श्री. किशोर कुमेरिया, श्री. दिनेश यादव, श्री. अ. करीम अ. गफ्फार पटेल(शकील पटेल) यांनी केले आहे.

महिलांच्या सोयीसाठी तत्पर-  महापौर

रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भाऊरायाची भेट घेण्यासाठी महिलांना या दिवशी कोणतेही तिकीट काढावे लागू नये, यासाठी मनपाने विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील  महिलांनी या सुविधेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा. महिलांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी म्हटले आहे.

10 वर्षाखालील अपत्यांनाही लाभ – मंगला खेकरे

रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांसोबत प्रवास करणाऱ्या 10 वर्षाखालील अपत्यांना सुद्धा या  सवलतीचा लाभ मिळणार असल्याचे परिवहन समितीच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी सांगितले. मनपाच्या  एसी व नॉन एसी अशा दोन्ही प्रकारच्या  बसमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याचेही श्रीमती मंगला खेकरे  यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT