नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासोबतच अर्ज छाननीचीही प्रक्रिया पार पडली. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार ४ नोव्हेंबर ही शेवटची संधी आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभांसाठी राजकीय पक्षांसह अपक्ष असे २८९ उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत. त्यापैकी किती जण सोमवारी आपली उमेदवारी मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमके किती उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहणार हे निश्चित होणार आहे.यावेळी महायुती आणि मविआमध्येही मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. या बंडखोरांना थंड करण्यात अर्थात त्यांची उमेदवारी मागे घेण्यात पक्षश्रेष्ठींना किती यश येते, हे सोमवारलाच दुपारी 3 नंतर निश्चित होणार आहे.(Maharashtra assembly poll)
नागपूर जिल्ह्यात शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा विधानसभा मतदासंघांच आहेत. यंदा महायुती आणि मविआ हे प्रमुख तीन-तीन पक्ष परस्पर विरोधात लढत असल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. सर्व बंडखोर आपलेच असून, त्यांची समजूत काढण्यात यश आले आहे ते नक्कीच माघार घेतील असा विश्वास भाजप व कॉंग्रेस नेते व्यक्त करत आहेत. असे असले तरी यातील कोणकोण बंडोबा आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील यात राजकीय धुरंधरांची कसोटी लागणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील दक्षिण-पश्चिम, पश्चिम, मध्य, उत्तर, दक्षिण, सावनेर, कामठी, उमरेड अशा आठ मतदारसंघामध्ये भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. पूर्वमध्ये महायुतीत बंडखोरी,काटोलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप आणि मविआत तर रामटेकला दोन्ही सेना आणि काँग्रेसची लढाई आहे.(Maharashtra assembly poll)