Bomb Threat AI Photo
नागपूर

Nagpur School Bomb Threat | नागपुरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टी जाहीर

१९ ऑगस्टला आलेल्या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख; पोलिसांकडून शाळांच्या परिसराची कसून तपासणी

पुढारी वृत्तसेवा

Nagpur School Holiday

नागपूर : नागपूर शहरातील १८ नामांकित शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने नागपुरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख करण्यात आल्याने आज संबंधित शाळांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे.

धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित शाळांच्या परिसराची सखोल तपासणी केली. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक आढळले नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, धमकीचे ई-मेल बांगलादेश आणि फ्रान्समधून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ई-मेलचा नेमका स्रोत कोणता आणि धमकीमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे.

शाळांभोवती सुरक्षा वाढवली

धमकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी संबंधित शाळांच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांसह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

पालकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

या घटनेमुळे पालकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT