नागपूर: नागपूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि सर्व शासकीय कार्यालयांना एकाच छताखाली आणणाऱ्या १२ मजली भव्य प्रशासकीय इमारतीचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.२) दिले. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला १०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सुमारे तीन एकर जागेवर बारा मजली सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त इमारतीचे बांधकाम सुरू असून या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके, विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता ऋतुजा वंजारी, संतोष जाधव, कंत्राटदार विलास बिदारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या इमारतीचे बांधकाम करण्यात येत असून या इमारतीसाठी 271 कोटी 34 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण इमारत ग्रीन बिल्डिंग म्हणून तयार करण्यात येत असल्यामुळे 125 किलो वॅट सोलरची सुविधा आहे. येथील उन्हाळ्यातही या इमारतीमध्ये उष्णता रोधक व्यवस्था राहणार आहे.
या इमारतीमध्ये दोन टॉवर असून, स्वतंत्र वाहन तळ, 500 क्षमतेचे सभा कक्ष, कॉन्फरन्स हॉल आणि संपूर्ण इमारत वातानुकूलित असल्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही. या इमारतीसाठी आठ लिफ्ट असून जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय तसेच संबंधित शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या इमारतीच्या बांधकामा अंतर्गत येणाऱ्या वृक्षांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथील वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असून, 2000 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. सध्या इमारतीच्या बेसमेंट व पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून दिलेल्या वेळेत ही इमारत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी दिली.