नागपूर

नागपूर : कामठीमध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर १०० जणांना विषबाधा

backup backup

नागपूर/कामठी; पुढारी वृत्तसेवा : कामठी येथे शुक्रवारी (दि. ८) महाशिवरात्री निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपवासाची पदार्थ खाल्ल्यानंतर जवळपास १०० जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.

कामठी येथील घटनेत सायंकाळी अनेकांनी शहरातील एका फराळाच्या दुकानातून फराळी चिवडा व जिलेबी विकत घेतली. रात्री घरी गेल्यावर हा फराळी चिवडा व जिलेबी खाल्ल्याने अचानक रात्री एक वाजताच्या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडू लागली. पोटदुखी व मळमळ वाटू लागले व उल्ट्याचा त्रास सुध्दा त्यांना होऊ लागला. सोयीनुसार त्यांना शहरातील विविध खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येरखेडा गावातील एकाच कुटुंबातील पाच लोकांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले. शहरातील आशा हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, राय हॉस्पिटल, कळमना मार्गावरील लाईफ लाईन हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.या रुग्णात कामठी नगर परिषद येथील कर्मचारी प्रदीप भोकरे व त्यांच्या आईचा सुध्दा समावेश आहे. दरम्यान,छावणी परिषद परिसरात असलेल्या पुराना गोदाम वस्तीत एकाच कुटुंबाच्या सदस्यांनी सिंगाडे पीठ आणले. पुऱ्या खाल्ल्या नंतर घरातील नऊ सदस्यांना रात्री एक वाजताच्या सुमारास पोट दुःखी, मळमळ आणि उल्टीचा त्रास सुरू झाला. घरातील मोठ्या व्यक्तीची प्रकृती पूर्वीपासूनच बरी नसल्याने तो व त्याचा लहान मुलगा लवकरच झोपी गेले होते . या दोघांनी या पुऱ्याचे सेवन न केल्याने त्यांना काहीही झाले नाही. घरातील इतर सदस्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने रात्री दीड वाजता सर्वांना छावणी परिषद परिसरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले पण रात्री पाळीला या रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने त्यांना फिरावे लागले. शेवटी सर्वांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.आज शनिवारला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

विषबाधा झालेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सोनी पिल्ले वय 36, राणी पिल्ले वय 28, उदय पिल्ले वय 17, टिना पिल्ले वय 20,लल्ली पिल्ले वय 52, निशी पिल्ले वय 25, अवनी पिल्ले वय 15, रवींद्र पिल्ले वय 35 आदींचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास जुनी कामठी पोलीस करीत आहेत.

या प्रकाराबाबत खाद्य निरीक्षक यांचा अहवाल मिळताच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जुना कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिताडे यांनी सांगितले. दरम्यान, शिंगाडा पिठापासून बनविलेले अन्न पदार्थ खाल्याने नारा नारी, त्रिमूर्तीनगर, खामला, बिनाकी मंगळवारी, विनोबा भावे नगर, तांडापेठ, गड्डीगोदाम खलाशी लाईन, इटा भट्टी, मोहन नगर, न्यू फुटाळा तलाव परिसरातील सुमारे ५० हून अधिक नागरिकांना उलट्या, हगवण, पोटदुखी, अंगदुखी सारखी लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने मेडिकल, मेयोच्या मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले. या सर्वांनी विकत घेतलेले शिंगाडाचे पिठ एकाच मुदतबाह्य असल्याचे सांगितले जात आहे.विक्री करणाऱ्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हा भेसळीचा प्रकार असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शिंगाडा पिठापासून बनविलेले पदार्थ खाल्याने गड्डीगोदाम, खलाशी लाईन, मोहन नगर येथील ३४ जणांना उलट्या, संडास, पोटदुखी, चक्कर येण्यासारखी लक्षणे घेऊन मेयोत उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात ८ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. तर मेडिकलमध्ये ३ महिला आणि एका पुरुषाला अशीच लक्षणे आढळल्यानंतर मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील इतरही खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांवर उपचार झालेत व होतही आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.