नागपूर : धंतोली तकिया परिसरात मंगळवारी रात्री उशीरा एका २० वर्षीय युवकाचा खून झाला. करण उर्फ लकी राजेश नायकर असे त्याचे नाव असून या हत्येने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लकिच्या भावाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिस ठाण्यात संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. हत्येची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. धंतोली तकिया परिसरातील कुणाल व लकी, राजू तपनची जुनी मैत्री आहे. गेले काही दिवस त्यांच्यात फारसे पटत नव्हते. लकी कुणाशीही चांगले बोलत नसल्याने अनेक जण दुखावले होते. मंगळवारी रात्रीचा असाच एक वाद लकीच्या जीवावर उठला. कुणाल राऊत व त्याची पत्नी, मेहुणा आणि इतर साथीदारांनी लकीला बेदम मारहाण केली. शस्त्राने पोटात अनेक वार केल्याने तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. संशयित आरोपी फरार असून पोलिस तपास करत आहेत.