नागपूर: २०२२ साली 'मिस्टर इंडिया'चा किताब पटकावणाऱ्या नागपूरच्या एका प्रसिद्ध बॉडीबिल्डरला एमडी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. संकेत बुग्गेवार असे या बॉडीबिल्डरचे नाव असून, तो माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा आहे. गणेशपेठ पोलिसांनी ही खळबळजनक कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये ड्रग्जची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला. संकेतच्या थार गाडीची झडती घेतली असता, त्यात १६ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी ड्रग्जसह थार गाडी जप्त केली असून, एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विशेष म्हणजे, संकेत बुग्गेवार हा एक यशस्वी जिम ट्रेनर आणि बॉडीबिल्डर आहे. त्याने २०२२ मध्ये दिल्लीत झालेल्या 'बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णपदक पटकावत 'मिस्टर इंडिया'चा किताब जिंकला होता. एका राष्ट्रीय चॅम्पियनचा ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग उघड झाल्याने क्रीडा क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात संकेतने हे ड्रग्ज प्रणय बाजारे नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. गणेशपेठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.