Ashish Jaiswal Political Claim
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा वेगाने विस्तार होत आहे. शिवसेना सर्वसामान्यांसाठी कार्य करत असल्याने आगामी काळात आणखी अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी आज (दि.१४) विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला.
दरम्यान, शिवसेना चिन्ह संदर्भात न्यायालयीन सुनावणी पुढे गेली आहे. त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे. आज मुंबईत या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत आगामी पक्ष प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवण मिळाल्याच्या कारणावरून कँटीन चालकाला मारहाण केली. हे वर्तन निश्चितच समर्थनीय नाही. मात्र, काही वेळा लोकांचा राग अनावर होतो आणि भावनेच्या भरात अशी कृती घडते. यावर वरिष्ठांनी योग्य ती भूमिका मांडली असल्याचे आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली टीका ही त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याला शोभणारी नाही, असे मत जैस्वाल यांनी व्यक्त केले.