नागपूर: सुट्टीवर आलेल्या एका मद्यधुंद लष्करी जवानाने रामटेक तालुक्यातील रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. भरधाव आणि बेधुंदपणे कार चालवत या जवानाने रस्त्यावरील सुमारे २५ ते ३० नागरिकांना कट मारल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. संतप्त गावकऱ्यांनी जवानाला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
हर्षपाल वाघमारे हा भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असून काही दिवसांपूर्वीच तो सुट्टीवर आपल्या गावी आला होता. रामटेक तालुक्यातील नगरधन येथे रविवारी रात्री वाघमारेने रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. हर्षपाल हा मद्यपान करून कार चालवत होता. नगरधन गावातील साई मंदिर मार्गावरून गावाकडे जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील नागरिकांना कट मारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची कार परिसरातील एका झाडाला धडकून नाल्यात कोसळली. यात हर्षपाल जखमी झाला. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाच्या तावडीतून हर्षपाल वाघमारे याची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रामटेक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.