नागपूर: अपघात विमा दाव्यासाठी मराठीत असलेल्या एफआयआरचे (FIR) हिंदीत भाषांतर मागितल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नागपुरातील युनियन बँकेच्या शाखेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मनसे कार्यकर्त्यांनी फ्रेंड्स कॉलनी येथील बँक शाखेसमोर जोरदार आंदोलन करत बँकेच्या फलकाला काळे फासले. यानंतर पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या योगेश बोपचे या तरुणाच्या कुटुंबीयांनी अपघात विम्यासाठी बँकेकडे दावा दाखल केला होता. हा विमा योगेशच्या युनियन बँकेतील खात्याशी संलग्न होता. मात्र, दावा प्रक्रियेसाठी बँकेने मराठीतील एफआयआरचे हिंदी भाषांतर करून देण्याची मागणी केली, असा आरोप बोपचे यांच्या शेजाऱ्यांनी केला. मराठी भाषेचा अपमान झाल्याचा आरोप करत मनसेने या प्रकरणी बँकेविरोधात एल्गार पुकारला.
दरम्यान, युनियन बँकेने यावर आपली बाजू मांडली आहे. "सदर अपघात विमा हा जनरल इन्शुरन्स कंपनीचा असून, त्या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात आहे. तेथील अधिकाऱ्यांना मराठी भाषा समजत नसल्याने, दावा प्रक्रियेसाठी एफआयआरची हिंदी किंवा इंग्रजी प्रत मागितली जाते. यासोबत मूळ मराठी एफआयआरसुद्धा जोडलेली असते. योगेश बोपचे यांच्या प्रकरणातही हीच प्रक्रिया होती. मराठी भाषेचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता," असे बँकेचे व्यवस्थापक हर्षल जुननकर यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या आंदोलनाची दखल घेत युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकारी आणि बोपचे कुटुंबीयांची माफी मागितली. बँकेने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले. या प्रकरणात मराठी भाषेचा अपमान झाल्याचा मुद्दा नसताना काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला, असे पोलिसांनी सांगितले. बँकेने माफी मागितल्याने आता हा वाद संपुष्टात आला आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणात बोपचे कुटुंबीयांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ज्या नातेवाईकासाठी योगेश बोपचे ८ जून रोजी एम्स रुग्णालयात जेवणाचा डबा पोहोचवण्यासाठी गेला होता, त्याच रुग्णाचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे संपूर्ण बोपचे कुटुंब त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. एकाच कुटुंबावर ओढवलेल्या या दुहेरी संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.