नागपूर: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत मात्र महायुती विरोधात भूमिका घेतल्याचे तूर्तास दिसत आहे.
गेले दोन दिवस मनसे प्रमुख राज ठाकरे अमरावती येथे विदर्भातील विविध मतदार संघाचा आढावा घेत आहेत. मनसेने पदाधिकारी तुषार गिरे यांच्या नावाला दक्षिण पश्चिम मतदारसंघात हिरवा दिवा दाखवल्याची माहिती सुत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने देखील 7 उमेदवारांची यादी जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्याच निवासस्थान परिसरातील उमेदवार दिला आहे. एकंदरीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले फडणवीस यांना विरोधकांनी नागपुरातच घेरण्याची रणनीती अवलंबिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र हा भाजपला सोयीचा असा मत विभाजनाचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.