नागपूर : लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपच्या प्रचंड विरोधामुळे शिवसेनेचे तिकीट कापण्यात आलेले व पुढे विधान परिषदेत पुनर्वसन झालेले आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांना मंत्रिपद अद्यापही मिळू शकलेले नाही. मात्र, आता त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूरच्या संपर्कप्रमुख पदी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना संधी दिली गेली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडे असणाऱ्या रामटेक मतदारसंघात भाजप, शिंदे गटात कमालीची रस्सीखेच सुरू होती. ठाकरे गटाने महाआघाडीत मित्रपक्ष काँग्रेससाठी हा मतदार संघ सोडला. काँग्रेसने बाजीही मारली. माजी मंत्री सुनील केदार यांनी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा केला. भाजपने कृपाल तुमाने यांच्या उमेदवाराला विरोध केल्यानंतर शिंदे गटानेही माघार न घेता काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा देत आलेले राजू पारवे यांचे हाती शिवधनुष्य सोपवले. भाजप नेत्यांची शिष्टाई यासाठी कामी आली.पारवे महायुतीचे उमेदवार झाले खरे मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अखेर ते काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये गेले.
आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने यांच्याकडे ही नवी जबाबदारी देत रामटेक लोकसभा मतदारसंघावरील आपला दावा एकप्रकारे कायम ठेवला आहे. कृपाल तुमाने यांनी 2014 व 2019 साली या मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना विधान परिषद व मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र सरकार आल्यानंतर ते पाळले नाही. एकीकडे अपक्ष अॅड. आशिष जयस्वाल शिंदे सेनेतून आमदार, राज्यमंत्री झाले. दुसरीकडे तुमाने खासदार ऐवजी आमदार झाले. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपली ताकद दाखविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यानंतरच त्यांचा मंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकतो, असा संदेश या निमित्ताने शिंदे यांनी दिल्याचे बोलले जाते.