crime News pudhari photo
नागपूर

Nagpur crime news: बुटीबोरीत मेफेड्रोन तस्करीचा पर्दाफाश; ७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक आणि बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेफेड्रोन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur crime news

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक आणि बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेफेड्रोन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. बुटीबोरी एमआयडीसी चौक परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोनसह कार, मोबाईल आणि रोख रक्कम, असा एकूण ७ लाख ६५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

नागपूर ग्रामीण पोलिसांचे अंमली पदार्थविरोधी पथक नागपूर उपविभागात गस्त घालत असताना मेफेड्रोनची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी चौक परिसरात सापळा रचला.

दरम्यान, एमआयडीसी चौकातून पुण्यनगरी प्रेस रोडच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्ट कारवर पोलिसांना संशय आला. पोलिसांची गाडी दिसताच चालकाने कार भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून कार अडविली. कारची झडती घेतल्यानंतर बुटीबोरी येथील एजाज गुलाम शेख (वय ३४) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेला अन्य एक व्यक्ती मात्र अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.

७.१३ ग्रॅम मेफेड्रोनसह मुद्देमाल जप्त

पंचांसमक्ष आरोपी आणि कारची झडती घेतली असता ७.१३ ग्रॅम मेफेड्रोन पावडर, दोन मोबाईल फोन, एक फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ६५ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज शेख याला अटक करण्यात आली असून, फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT