पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत  File Photo
नागपूर

30 मार्चला मोदी - भागवत एका व्यासपीठावर, रेशिमबागेत जाण्याची शक्‍यता ?

PM Modi - Mohan Bhagwat | माधव नेत्रालय इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त पंतप्रधान नागपूरात

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - येत्या 30 मार्च रोजी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपुरात माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचे हिंगण्यात भूमिपूजन होणार आहे. आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची त्याच दिवशी जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एका व्यासपीठावर येणार आहेत.

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त हे दोघेही एकत्रित आले होते. यानंतर उपराजधानीत कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी पंतप्रधान मोदी येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. सार्वजनिक कार्यक्रमात हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येणार असल्याने त्यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आचार्य गोविंद गिरी महाराज, अवधेशानंद गिरी महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात गुढीपाडवा अर्थात वर्ष प्रतिपदेच्या निमित्ताने नागपुरात होणारा हा कार्यक्रम लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरला भेट देण्याची शक्यता वर्तविली आहे. माधव नेत्रालय नेत्रसंस्था व संशोधन केंद्र ही संघ परिवारातीलच एक भाग असल्याने हे निमंत्रण मोदींनी स्वीकारले. मात्र, इतर दौरा निश्चित झालेला नाही. 18,23 मार्चला पूर्वतयारी बैठका आहेत गेली अनेक वर्षे या भेटीची उत्सुकता सर्व सामान्यांनाच नव्हे तर संघ स्वयंसेवकांना देखील आहे. या भेटीत माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार असल्याची माहिती आहे. अद्याप याविषयीचा कुठलाही दौरा आलेला नसला तरीही मोदींची ही भेट झाल्यास रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. हिंगणा मार्गावर 5.83 एकर परिसरात ही माधव नेत्रालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. 250 खाटांचे रुग्णालय आहे. पाच लाख चौरस फुटांच्या प्रकल्पाची किंमत 517 कोटी रुपये आहे. 27 मार्च 2028 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती डॉ अविनाश अग्निहोत्री यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT