Nagpur CP Vishwas Nangre Patil Pudhari
नागपूर

Vishwas Nangre Patil | औद्योगिक सुरक्षेला देशाच्या आर्थिक, ऊर्जा सुरक्षेचा आधारस्तंभ बनवा : विश्वास नांगरे पाटील

डब्ल्यूसीएलच्या सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थींच्या शिस्तीचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

Nagpur CP Vishwas Nangre Patil

नागपूर : औद्योगिक सुरक्षा ही केवळ एखाद्या आस्थापनाच्या सुरक्षेपुरती मर्यादित नसून देशाच्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याने शिस्त, समर्पण, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) इंदोरा, नागपूर येथील सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात सोमवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता आयोजित दीक्षांत समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण करून पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी मानवंदना स्वीकारली.

डब्ल्यूसीएलच्या विविध अनुषंगिक कंपन्यांमधून आलेले अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेली शिस्त, व्यावसायिक कौशल्य आणि कर्तव्याप्रतीची बांधिलकी यावेळी प्रभावीपणे प्रदर्शित केली. प्रशिक्षणार्थींचे शिस्तबद्ध संचलन आणि व्यावसायिक तयारीचे पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले.

सुरक्षा क्षेत्रात काम करताना केवळ प्रशिक्षण पुरेसे नसून प्रसंगावधान, शिस्त आणि जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे, असे नांगरे पाटील यांनी सांगितले. औद्योगिक प्रकल्प, ऊर्जा निर्मिती आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या सुरक्षेत सुरक्षा कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रशिक्षणार्थींनी आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करून सेवेत दक्षता कायम ठेवावी, असा संदेशही त्यांनी दिला.

प्रशिक्षणाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्मार्ट फायरींग सिम्युलेशन सुविधेची पाहणी

दीक्षांत समारंभानंतर पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी इंदोरा येथील सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या स्मार्ट व आधुनिक शस्त्र प्रशिक्षण आणि फायरींग सिम्युलेशन सुविधेची पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

औद्योगिक सुरक्षेसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सरावाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT