नागपूर: ऍडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात आज एकूण 4 सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाचा सामंजस्य करार राज्य सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय, संभाजीनगर येथे १५० एकर क्षेत्रावर सप्लायर पार्क उभारण्यात येणार असून, पुढील टप्प्यात त्याचा विस्तार इगतपुरी येथे सुमारे ३०० एकर क्षेत्रावर करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपुरात तब्बल १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
ही गुंतवणूक आगामी दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने होणार असून, २०२८ पासून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत नागपुरात एक इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल फॅसिलिटी उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहन आणि ट्रॅक्टर उत्पादन विभागांचा समावेश असेल.या प्रकल्पासाठी नागपुरात सुमारे १,५०० एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होणार आहे.
महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण असून राज्य सरकार तसेच स्थानिक लोक अत्यंत उद्योगस्नेही आणि महत्त्वाकांक्षी असल्याचे मत महिंद्रा अँड महिंद्राचे राजेश जेजुरीकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी संपूर्ण प्रक्रियेत दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य वित्तीय सल्लागार कौस्तुभ धावसे, राज्याचे उद्योग सचिव पी. अन्बलगन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे अध्यक्ष आशीष काळे यांच्या तर्फे करण्यात आलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत, विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.