नागपूर : एकीकडे मुंबईत महायुतीच्या बैठकामधून उमेदवार यादी जवळपास अंतिम टप्प्यात असताना विदर्भात महायुती स्वतंत्र लढणार की एकत्र याबाबतीत निर्णय झाला आहे. यानुसार नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट स्वतंत्र लढणार आहे. 27 डिसेंबरपर्यंत उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील.
महायुतीची नागपुरात शुक्रवारी (दि.२६) भाजपनेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत, संजय राठोड आणि राज्यमंत्री आशिष जयसवाल हे तीन मंत्री तसेच अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चार महानगरपालिका क्षेत्रातील समन्वयाची जबाबदारी असलेले शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते.
या बैठकीत चारही महानगरपालिकांमध्ये भाजपा–शिवसेना महायुती करण्याचा निर्णय जवळपास अंतिम झाला आहे. संध्याकाळपर्यंत जागावाटप पूर्ण होईल. बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत येण्याचे संकेत आहेत. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचा पक्ष महायुतीसोबत येत आहे. नवनीत राणा देखील बैठकीत होत्या.
चंद्रपूरमध्येही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूरमध्ये सध्या भाजपा–शिवसेना महायुतीचाच विचार सुरू आहे. राष्ट्रवादीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.चंद्रपूर संदर्भात बैठक झाली. ही निवडणूक माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सर्वांनी त्यांचे नेतृत्व मान्य केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.