नागपूर: झपाट्याने नागपुरात पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीत सोमवारपासून (दि. ८डिसेंबर) नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. राज्यावर आर्थिक संकट, मंत्र्यांचे घोटाळे, शेतकरी संकटात आणि दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांशिवाय या अधिवेशनात विरोधकांची कसोटी लागणार आहे.
आज रविवारी (दि.७ डिसेंबर) दुपारी 12 वाजता विरोधकांची बैठक रवी भवन येथील दालना ऐवजी काँग्रेसच्या विधान भवन येथील कार्यालयात होणार आहे. यात कशा पद्धतीने आठवड्याभराचे अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडायचे यावर मंथन होणार आहे. याविषयीची माहिती दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी सायंकाळच्या चहापानाचे विरोधकांना निमंत्रण दिले असले तरी राज्यातील वर्तमान परिस्थितीत विरोधक चहापानाला जाणार नसल्याची माहिती आहे. यावेळी केवळ आठवडाभर 14 डिसेंबरपर्यंतच कामकाज होणार आहे. आज रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. विरोधक नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर हे अधिवेशन होणार असल्याने उत्सुकता होती मात्र आता निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर पडला असल्याने आचारसंहितेचे सावट या अधिवेशनावर असणार आहे.