नागपूर : वर्ल्ड इकॉनोमिक फोरमच्या वतीने आयोजित दाओस येथील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आपण लवकरच जात असून या माध्यमातून जगभरातील राजकीय नेते, गुंतवणूकदार, उद्योजक यांच्याशी आपली चर्चा, आर्थिक गुंतवणूक विषयक विचारांचे आदानप्रदान होणार आहे. अनेक महत्त्वाच्या बैठका माझ्या ठरल्या आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरेश भट सभागृहात शुक्रवारी सायंकाळी मुकुंद कानिटकर यांच्या 'बनाये जीवन प्राणवान ' या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बीड प्रकरणी जन भावनांचा आदर करीत कारवाई करण्यात आली. पोलीस तपास यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत आहे. मुळात त्यांना त्यांचे काम योग्यरित्या करू द्यावे ही आपली भूमिका आहे. जे जे कोणी दोषी असतील त्या कुणालाही सोडण्याचा प्रश्न नाही हे आपण वारंवार सांगितले. मात्र रोज सर्व बाबी पोलीस यंत्रणा तपशीलवार बाहेर सांगू शकत नाहीत. यासाठी तपास यंत्रणांवर कुठलेही दडपण नको अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
अनेक मोठ्या खटलांचा अनुभव असलेले आणि दोषींना शासन घडविण्यात मोलाची भूमिका असलेले ॲड. उज्वल निकम यांना या संदर्भात विशेष वकील म्हणून नेमण्याचा सरकारचा विचार आहे. मी विनंतीही केली असून ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आहे. मात्र अनेक जण निवडणूक लढल्यानंतर पुन्हा विधी क्षेत्रात कार्यरत आहेत.असे असताना आपल्या नियुक्तीचे राजकारण होऊ शकते असे त्यांनीच मला सांगितले असल्यामुळे जे लोक उज्वल निकम यांना विरोध करतील ते गुन्हेगारांनाच मदत करतील अशी परखड भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. दरम्यान, अभिनेता सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी पोलीस लवकरच सत्य बाहेर काढतील अनेक बाबी त्यांच्या हाती लागल्या आहेत असेही सांगितले. दिल्लीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचेच सरकार येणार आहे. कारण आपचे नेते, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील जनतेचा विश्वास उडला असल्याचे फडणवीस म्हणाले.