Shri Ambadevi Sansthan Chikhaldara Devi Point
नागपूर : विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थांनच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला बळ देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) मालकीची ३ एकर ८ आर जमीन अंबादेवी संस्थानास विनामूल्य देण्याच्या प्रस्तावास आज (दि.३१) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
चिखलदरा येथील सुमारे साडेसात एकर जमीन १९७५ मध्ये पर्यटनाच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती. मात्र, दीर्घकाळ ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यशस्वीपणे सांभाळत आहे. या दोन्ही देवस्थानांच्या अधिक चांगल्या विकासासाठी संस्थानाने शासनाकडे जागेची मागणी केली होती.
पर्यटन महामंडळाकडील ३ एकर ८ आर जमीन शासन जमा करून ती अंबादेवी संस्थानास विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. ही जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून दिली जाणार असून, तिचा वापर केवळ आणि केवळ धार्मिक प्रयोजनासाठीच करणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होतील. तसेच, चिखलदऱ्याच्या पर्यटन वैभवात भर पडेल. असा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.