नागपूर; आगामी विधानसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षांकडूनही मेळावे, इच्छुकांची चाचपणी, मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असताना निवडणूक आयोगाकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक सप्टेंबरच्या अखेर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी (दि.१३ सप्टेंबर) भारत निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोखालिंगम यांनी व्हीडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांकडून निवडणुकीबाबत करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेत, काही सूचनाही केल्या. राज्य सरकारची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणूका घेत नवीन सरकार येणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे, निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर व्हायचा असला तरी राज्यामध्ये निवडणूकीसाठी आवश्यक राजकीय वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती आहे. यावेळी नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदार संघाबाबत निवडणूकीच्यादृष्टीकोणातुन करण्यात आलेल्या तयारीची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली.
विधानसभेच्या कामकाजासाठी सुमारे २५ हजार कर्मचा-यांची गरज भासणार असून, निम्म्यावर कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली. ५५८ झोनल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असू २७८ पोलिस सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले. १२ मतमोजणी केंद्र व १२ स्ट्रॉंगरूम निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जानेवारी ते १२ सप्टेंबर२०२४ पर्यंत जिल्ह्यात नव्याने ४ लाखांहून अधिक नव मतदारांची भर पडल्याचे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले. यावेळी जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.