नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रासाठी तब्बल दीड लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी दिल्याची मोठी घोषणा केली. यातील बहुतांश कामांना पुढील तीन महिन्यांत सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त गडकरी यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. गडकरी यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 16,318 कोटी रुपये खर्चून नवीन पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गाची उभारणी करणार आहे. यासाठीच्या सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासांत कापता येईल आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हा प्रवास फक्त अडीच तासांत पूर्ण करता येणार आहे.
पुणे विभागासाठी 50,000 कोटी
पुणे विभागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांत या कामांना सुरुवात होईल, असे गडकरी यांनी सांगितले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्ग : 4,207 कोटी रुपये खर्चाच्या या मार्गाचे भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर केले जाईल. हडपसर-यवत उन्नत मार्ग : या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची प्रक्रिया सुरू असून, निवडणुकांनंतर कामाला सुरुवात होईल.
मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान
सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा नवीन द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार असून, यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त दीड तासांवर येईल. तसेच, मुंबई-पुणे-बंगळुरू हा एकूण प्रवास केवळ साडेपाच तासांत पूर्ण करणे शक्य होईल, असेही गडकरी यांनी नमूद केले. महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या दीड लाख कोटी रुपयांच्या कामांपैकी 50,000 कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहेत.