नागपूर : महाल हिंसाचारातील कथित सूत्रधार आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नियमित जामिनावर येत्या ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीश पवार यांच्यासमक्ष फहीमच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी झाली असता पोलीस विभागाने रामनवमीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे न्यायालयाला एक आठवड्याचा अवधी मागितला. न्यायाधीश पवार यांनी ८ एप्रिलपर्यंत अवधी प्रदान केला. सोमवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए.यू. मोटे यांनी फहीमची ११ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
गुन्हे शाखेने पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवला असून ते या प्रकरणात अधिक चौकशी तपास करायचा असल्यास पोलीस कोठडीची मागणी करू शकतात. फहीमची ३१ मार्च रोजी पोलीस कोठडी समाप्त झाल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने फहीमची ११ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
फहीम शमीम खान (वय ३८) रा. संजयबाग कॉलनी, नागपूर याने चिथावणी दिल्याने दोन गटात धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरात दंगल घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडे यांच्या तक्रारीवरून १८ मार्च रोजी देशद्रोहासह इतर गंभीर गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करून फहीम खानला अटक केली होती. आरोपीतर्फे अॅड. अश्विन इंगोले व सरकारतर्फे अॅड. मेघा बुरंगे यांनी बाजू मांडली.
सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकून नागपूर शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी आरोपीच्या नियमित जामिनावर उद्या बुधवारी, २ एप्रिल रोजी सत्र न्यायाधीश ओझा यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. आज मंगळवारी सुनावणी झाली असता सायबर पोलिसांनी आपले उत्तर सादर केले. यावर न्यायाधीश ओझा यांनी बुधवारी तपास अधिकाऱ्यांना डायरी सादर करण्याचे आदेश दिले.
मोहम्मद हमीद मोहम्मद हनीफ (वय ६९) रा. सेवासदन अपार्टमेंट, असे आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी मोहम्मद शहजाद परवेज मोहम्मद इब्राहीम (वय ४५) रा. आसीनगर, टेका व मोहम्मद हमीद मोहम्मद हनीफ या दोघांना अटक केली होती. मोहम्मद शहजाद हा सध्या न्यायालयीन कोठडीत, तर हमीद हा पोलीस कोठडीत आहे. आरोपींनी सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणारे आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे व्हिडीओ पोस्ट करून शेअर केले. हमीदने आपल्या मोबाइलवरून पोस्ट व्हायरल केले होते. आरोपींतर्फे अॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.