नागपूर : राजेंद्र उट्टलवार राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे सरकार, लोकप्रतिनिधी आणि संघटना अशी सर्वांची जबाबदारी वाढली आहे. लोकप्रतिनिधी आणि संघटनेने परस्परांचा सन्मान व समन्वय राखत सरकारच्या योजना लोकांपर्यंत आणि लोकांच्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करावे असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
भाजपच्या राज्यातील प्राथमिक सदस्यता अभियानाचा वसंतराव देशपांडे सभागृहात शुभारंभ झाला. याच अभियानाच्या निमित्ताने 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे रणशिंग भाजप फुंकण्याच्या तयारीत आहे. अडीच तीन वर्षे न झालेल्या या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी असलेली सुनावणी 4 जानेवारीला होऊ शकते असे संकेत फडणवीस यांनी दिल्याने आगामी तीन महिन्यात या निवडणुका होतील अशी शक्यता आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, अरविंद मेनन विधान परिषद सभापती राम शिंदे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रणधीर सावरकर, संजय भेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. 5 जानेवारीला आपल्या सर्वांनी मैदानात उतरून काम केले तर हे अशक्य नाही. केवळ भाषण न देता प्रत्येकाने योग्य नियोजन करून काम करावे असेही सांगितले. 1 ते 15 जानेवारी पर्यंत भाजपचे सदस्यता अभियान असून जे बूथ कमकुवत आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जाणार असून भाजपच्या मंडळांची पुनर्रचना केली जाणार आहे. सदस्यता नोंदणीत लाडक्या बहिणीवरही लक्ष केंद्रित करावे असेही त्यांनी सांगितले.