नागपूर : सैनिकांची हालचाल अधिक सुलभ व्हावी, युद्धभूमीत वेग आणि चपळता वाढावी, यासाठी अतिशय हलक्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या विकासावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) काम करत आहे. या संस्थेकडून विशेष संशोधन प्रकल्पांतर्गत सध्या 7.5 किलो वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट विकसित करण्यात आले असून, येत्या काळात हे वजन 6 किलोपेक्षाही कमी करण्याचे उद्दिष्ट संशोधकांनी ठेवले आहे.
अॅल्युमिनियम आणि संमिश्र (कॉम्पोझिट) पदार्थांच्या वापरातून तयार करण्यात आलेल्या या जॅकेटची 7.62 मि.मी. कॅलिबरच्या गोळ्यांनी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सध्या वापरात असलेली जड जॅकेट सैनिकांच्या हालचालींवर मर्यादा आणतात. त्यामुळे वजन कमी करताना संरक्षण क्षमतेत कोणतीही तडजोड होऊ नये, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
ही संकल्पना नुकत्याच झालेल्या मिलिटरी-सिव्हिलियन फ्युजन (एमसीएफ) परिषदेत मांडण्यात आली. या परिषदेत लष्कर, संरक्षण क्षेत्र आणि नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रणभूमीवर सैनिकांना वेगवान हालचाल करता यावी, यासाठी बुलेटप्रूफ जॅकेटचे वजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. हलके जॅकेट म्हणजे अधिक सुरक्षितता आणि कार्यक्षमता, असे मत ‘व्हीएनआयटी’च्या सूत्रांनी व्यक्त केले.
दरम्यान, ‘व्हीएनआयटी’मध्ये ‘डीआरडीओ’ची स्वतंत्र शाखा स्थापन होण्याचीही शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. तसे प्रत्यक्षात झाले तर संरक्षण संस्थांना शैक्षणिक सहकार्याची गरज असलेले प्रकल्प थेट ‘व्हीएनआयटी’कडे येणे शक्य होणार आहे.
संरक्षण संशोधनाच्या क्षेत्रात ‘व्हीएनआयटी’कडून अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. ‘डीआरडीओ’कडून संदर्भित आर्टिलरी गन प्रकल्पावरही संस्था काम करत आहे. साहित्य विकास, एम्बेडेड सिस्टीम्स आणि रासायनिक प्रक्रिया या क्षेत्रांतही संशोधन सुरू आहे.