नागपूर : पुढारी वृत्तसेवा
उपराजधानी आता वन्यप्राण्यांना देखील हवीहवीशी वाटत आहे असे म्हटल्यास नवल नाही सातत्याने सीमावर्ती भागात बिबट्या दिसत आहे. मात्र अनेकदा याकडे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे. बनवाडी परिसरातील सहारा सिटी गृहनिर्माण प्रकल्पातील बिबट्याचा शोध घेण्यास अखेर नागपूर वनविभागाने सुरुवात केली आहे. या बिबट्याचा फिरण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात असून त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात येणार आहे.
अर्धवट अवस्थेत असलेल्या सहारा सिटी परिसरात १३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास एक बिबट्या नजरेस पडला. तेव्हापासून दररोज सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान बिबट्या याच परिसरात फिरताना लोकांना दिसला आहे.मुलांच्या शाळेची ही वेळ असल्याने पालक, विद्यार्थी चिंतेत आहेत. बिबट्याने आतापर्यंत या भागातील दोन ते तीन पाळीव गुरांची शिकार केली आहे. ग्रामस्थांनी
वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतरही कोणतीही पावले उचलली जात नसल्याचा संताप व्यक्त झाला.या भागात बिबट्यांचा कायमच वावर असल्याने एकापेक्षा जास्त बिबटे येथे असण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या फिरण्याचा मार्ग माहिती होताच त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल', अशी माहिती नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांनी दिली.