बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील बिबट सफारीत घुसून तीन बिबट्यांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर नर बिबट्याला वन विभागाने सोमवारी पहाटे जेरबंद केले. रविवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर वन विभाग, प्राणिसंग्रहालय प्रशासन आणि वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून अखेर या बिबट्याला पकडण्यात यश मिळवले.
गोरेवाडा जंगलातील हा नर बिबट रविवारी दुपारच्या सुमारास प्राणिसंग्रहालयाचे कुंपण ओलांडून बिबट सफारी परिसरात शिरला होता. तेथे त्याचा सफारीतील बिबट्यांशी संघर्ष झाला. या संघर्षात प्राणिसंग्रहालयातील दोन नर आणि एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी केली. तपासणीदरम्यान तिन्ही बिबट्यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार मृत बिबट्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने रविवारी दुपारपासूनच विशेष मोहीम हाती घेतली. डार्ट गनच्या सहाय्याने त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डार्ट लागल्यानंतर बिबट झुडपांमध्ये लपून बसला. मात्र औषधाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला. त्यामुळे वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आणि विविध ठिकाणी पिंजरे लावले.
अखेर सोमवारी पहाटे हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या कारवाईमुळे इतर प्राण्यांवरील संभाव्य हल्ल्यांचा धोका टळल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सांगितले.
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीमध्ये यापूर्वी आठ बिबटे होते. रविवारी झालेल्या घटनेनंतर आता तेथे एक नर आणि चार मादी असे एकूण पाच बिबटे शिल्लक राहिले आहेत. बाहेरील बिबट्यांनी प्राणिसंग्रहालय परिसरात प्रवेश केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असल्या, तरी अशा संघर्षात एकाच वेळी तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.