लाडकी बहीण योजना फार काळ चालू शकणार नाही : विजय वडेट्टीवार File Photo
नागपूर

लाडकी बहीण योजना फार काळ चालू शकणार नाही : विजय वडेट्टीवार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : राजेंद्र उट्टलवार

केवळ आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी महायुतीने मध्यप्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र यातून त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. ही योजना फार काळ चालू शकणार नाही असे ठोस प्रतिपादन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. या योजनेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मध्य प्रदेशमध्ये आर्थिक संकटाचा दाखला देत लाडली बहन योजना ४ महिन्यांत बंद करण्यात आली आहे. आज ना उद्या महाराष्ट्रातही तीच परिस्थिती निर्माण होईल. येथेही लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल असे ते म्‍हणाले.

वडेट्टीवार असेही म्हणाले की, केवळ विरोधकच याबाबतीत बोलतात असे नाही तर सरकरमधीलही लोकही यावरून उद्भवलेल्‍या आर्थिक संकटावर बोलत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कधी-कधी खरे बोलतात. त्यांनी देखील नुकतेच या योजनांबाबत काय ते सत्य सांगितले आहे. याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.

ओबीसी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

दरम्यान, ओबीसी आंदोलनाबाबत लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवर वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या मुद्द्यांवर मुंबईत आंदोलन पुकारले ते सांगावे. महायुतीबाबत जनतेत नाराजी आहे. महिला सुरक्षेसाठी गंभीर नसणारे, महाराष्ट्राला घोटाळे करणारे सरकार नको आहे. महायुतीच्या नेत्यांना आता सत्ता मिळवता येणार नाही. ते राज्यात फिरू शकणार नाहीत. सरकारने केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. आजही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घोषणा केल्या जात आहेत असे ते म्‍हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT