नागपूर

कोराडी येथे सर्वात उंच हनुमान मूर्ती, जूनमध्ये अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण

Koradi Hanuman Statue Nagpur | या परिसरात हनुमानाची ही भव्य मूर्ती व परिसर येथील आध्यात्मिक केंद्रासह पर्यटनाला चालना देईल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मध्य भारतातील आदिशक्ती स्थळ म्हणून गणल्या जाणाऱ्या कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात सर्वात उंच १६२ फूट हनुमान मूर्ती उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. या परिसराचे लोकार्पण जून महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण संकुल, महिला प्रशिक्षण केंद्र साकारून आध्यात्मिक केंद्रासह पर्यटन संकुलाच्या दृष्टीने रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीने नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. या परिसरात हनुमानाची ही भव्य मूर्ती व परिसर येथील आध्यात्मिक केंद्रासह पर्यटनाला चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फाउंडेशनपासून २०६ फूट उंचीची ही मूर्ती असून प्रत्यक्ष मूर्तीचा आकार १६२ फूट आहे. ७४ फूट उंच गदा आहे. या ठिकाणी “सेव्हन-डी हनुमान चालीसा प्रोजेक्शन” करण्यात येणार असून भाविकांना हनुमानजींच्या माध्यमातून बलोपासना, उपासना, गुणग्राहकता एकाग्रता ही जीवनमूल्य अनुभवता येतील. मूर्तीखाली हनुमानजींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. येथे उभारण्यात येत असलेल्या वीर हनुमानाच्या भव्य मूर्तीचा पाया महानिर्मितीद्वारे तयार करण्यात आला आहे. परिसराच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लँडस्केपिंग आणि 'बटरफ्लाय गार्डन' (फुलपाखरू उद्यान) विकसित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT