न्हाने कुटूंबाचे घर, व कारचा झालेला अपघात  
नागपूर

Nagpur News | कामठीचा 'ब्लॅक मार्च - एप्रिल' : पुन्हा काळाचा घाला, चिमुकलीसह तिघांचा अपघातात मृत्यू!

गेल्या काही दिवसात कामठी परिसरातील अनेकांचा अपघाती मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर -​ लग्नकार्यासाठी निघालेल्या कामठी येथील एका कुटुंबावर काळाने आज मंगळवारी घाला घातला. अमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील खडका फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात खैरी गावातील विनायक कॉलनी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ​मृतकांमध्ये ​समाधान किसनराव नान्हे (६२), ​किरण गोपाळ नान्हे (२८)(सून), ​ दिया गोपाळ नान्हे (०३)(नात) (सर्व रा. विनायक कॉलनी, खैरी, कामठी) यांचा समावेश आहे.

​कामठीचा 'ब्लॅक मार्च - एप्रिल' नियतीचा क्रूर खेळ

​गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहिला तर कामठी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी हा काळ अत्यंत दुर्दैवी ठरत आहे.

पहिली घटना: काही दिवसांपूर्वी राजस्थानला देवदर्शनासाठी गेलेल्या कामठीच्या पार्से कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना 11 मार्च रोजी घडली.

दुसरी घटना: 19 मार्च रोजी उज्जैनवरून परतताना रनाळा येथील दोन तरुण व्यावसायिकाचा बैतूलजवळ अपघाती मृत्यू झाला आणि आज पुन्हा वरुडजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांमधील सदस्यांचा (आजोबा, सून आणि नात) अंत झाला.

​"भक्तीचा प्रवास असो वा आनंदाचा सोहळा, महामार्गावरील हे मृत्यूचे तांडव कधी थांबणार?" असा संतप्त आणि आर्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

​महामार्गावरील वाढते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी चिंतेचा विषय ठरत आहे. सकाळच्या वेळी चालकाला लागलेली डुलकी किंवा वेगावरील नियंत्रण सुटणे ही कारणे प्राथमिक स्तरावर समोर येत असली, तरी एकापाठोपाठ एक अनेक लोकांचा अपघातात मृत्यू झाल्याने जिल्हा हादरला आहे.

नव्या घराचा आनंद दुभंगला

मृतक समाधान नान्हे हे नागपूर आकाशवाणी येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. अनेक वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या शासकीय निवासस्थानात घालवली. निवृत्तीनंतर आनंदाने उर्वरित आयुष्य जगण्यासाठी त्यांनी कामठीच्या विनायक कॉलनी परिसरात नवीन 'डुप्लेक्स' विकत घेतले होते. त्यांचा मोठा मुलगा दीपक नान्हे हा देखील वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत आकाशवाणी नागपूर येथे सेवेत आहे.

​बंद दाराने दिला होता भविष्यातील संकटाचा संकेत?

​या घटनेतील विचित्र योगायोग असा की, मोठा मुलगा दीपक हा दोन दिवसांपूर्वीच आपल्या पत्नीसह बाहेरगावी गेला होता. आज गुरुवारी सकाळी जेव्हा तो घरी परतला, तेव्हा घराला कुलूप होते. वडील समाधान, भाऊ गोपाळ, वहिनी किरण आणि पुतणी दिया हे त्याच्या येण्यापूर्वीच कारने अकोल्याकडे लग्नासाठी निघाले होते. घराची चावी नसल्याने दीपकने शेजारी मोबाईल चार्ज केला आणि तो आपल्या कर्तव्यावर आकाशवाणी कार्यालयात निघून गेला. त्याला काय ठाऊक होते की, हे बंद दार आता कायमचेच बंद झाले आहे. ​काही तासांतच खैरी ग्रामपंचायत कार्यालयात अपघाताचा फोन खणखणला आणि ही माहिती दीपकला देण्यात आली.

​मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

​नान्हे कुटुंब हे मूळचे अकोला जिल्ह्यातील अडसूळ फाटा येथील रहिवासी आहे. ज्या गावी लग्नासाठी हे कुटुंब निघाले होते. तिथेच आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. समाधान नान्हे, त्यांची सून किरण आणि तीन वर्षांची नात दिया यांच्या पार्थिवावर अडसूळ फाटा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT