नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर ते पचमढी छिंदवाडा रोडवर सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेले जाम सावली येथील चमत्कारी श्री हनुमान मंदिर (हनुमान लोक) जाम सानवली येथे हनुमान जन्मोत्सवाचा भव्य सोहळा उद्या 12 एप्रिल रोजी होणार आहे. भाविकांची आज पूर्वसंध्येला मोठी गर्दी पहायला मिळत आहे. सुमारे 25 ते 30 फूट लांब अशी विशालकाय हनुमान मूर्ती या ठिकाणी विश्रांतीच्या अवस्थेत असून या प्रकारच्या देशात दोन ते तीन प्रतिमा असल्याचे जाणकार सांगतात.
महिलांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नाही. सातत्याने या ठिकाणी जलाभिषेक सुरू असतो. तीर्थ घेण्यासाठी लोक गर्दी करतात. गेल्या काही वर्षात या ठिकाणी मंदिराचे भव्य बांधकाम सुरू झाले असून, लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे. सकाळ, संध्याकाळची महाआरती अनुभवण्याची संधी घेण्यासाठी शनिवार, मंगळवारी भाविक नित्यनेमाने या ठिकाणी गर्दी करतात. उद्या हनुमान जयंती आणि शनिवार असा योग आल्याने हनुमान भक्तांमध्ये विशेष उत्साह आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल रोडवरील फेटरी, नारायणपूर, बेलोना, वर्धा रोडवर खडकी, नागपुरातील श्री राजाबाक्षा, तेलंगखेडी आदी विविध हनुमान मंदिरात देखील आज हनुमान जयंतीचा भाविकांमध्ये उत्साह विविध कार्यक्रमांनी ओसंडून वाहताना दिसला.
जाम सानवली, सौसर (मध्य प्रदेश) येथे 8 एप्रिलपासून, हनुमान जन्मोत्सवाच्या तीन दिवसीय भव्य उत्सवाला प्रारंभ झाला. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वतीजी यांनी श्री हनुमानजींच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले. राम कथाचे मुख्य यजमान दादाराव बोबडे, डॉ. प्रफुल्ल कंटक, विजय चौधरी, इंद्रचंद डागा आणि रमेश शर्मा पत्नीसह उपस्थित होते.
यानंतर श्रीराम कथेची सुरुवात झाली. तीन दिवस भक्त भक्ती सागरात मंत्रमुग्ध झाले. यावर्षी जन्मोत्सव कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे जाम सांवली धाम हनुमान लोक या अधिकृत भजनाचे प्रकाशन पार पडले. प्रसिद्ध भजन गायक महिर शर्मा यांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वतीजी यांच्यासमोर हे भजन सादर केले. "मेरा जाम सानवाली वाला हनुमत" हे भजनाचे बोल आहेत, जे हनुमानजींवरील अतूट भक्ती आणि जाम संवाली धामच्या वैभवाचे सुंदर वर्णन करतात.
भजन, गायन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव असलेले महिर शर्मा जी यांनी माजी श्री बागेश्वर धाम आणि पूज्य प्रेमानंदजी महाराज यांच्यासमोरही आपली कला सादर केली आहे. संध्याकाळी मंदिर परिसरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. पांढुरना जिल्हाधिकारी आणि व्यवस्थापक पब्लिक ट्रस्ट अजय देव शर्मा, पोलिस अधीक्षक सुंदर सिंह कनेश यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष गोपाल शर्मा आणि मंदिराच्या विश्वस्तांनी पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.