नागपूर : पुढारी वृत्तसेवा
आयपीएस पोलीस अधिकाऱ्याने डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच या पोलिस अधिकाऱ्याने पळ काढला. दर्शन दुगाड (वय ३०, रा. यवतमाळ) असे त्याचे नाव असून सध्या तो नंदूरबार जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये एमबीबीएचे शिक्षण घेत असताना डॉक्टर तरुणीची दर्शन दुगाडशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. मोबाईलवरून काही दिवसांतच दोघांची चांगली मैत्री झाली. २०२२ मध्ये दोघांची भेट झाली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, ही तरुणी एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाली. एके दिवशी दर्शनची आई आजारी पडल्याने तिने उपचार केला. ज्या खासगी रुग्णालयात ती अॅडमिट होती त्याचे बिलसुद्धा भरले, पण काही दिवसांनंतर दर्शनच्या आईचा मृत्यू झाला. काही दिवस गेल्यानंतर दर्शनने तिला फिरायला केरळमध्ये नेले. तेथे एका हॉटेलमध्ये शारीरिक संबंधाची मागणी केली.
मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे दर्शनने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर बळजबरीने दर्शनने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नागपुरात इमामवाड्यातील एका हॉटेलमध्येही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दर्शन आणि डॉक्टर तरुणी यांची ओळख झाली तेव्हा दर्शन बेरोजगार होता. डॉक्टर तरुणीने त्याला आर्थिक मदत केली. तो केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला. त्याची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेला. डॉक्टर तरूणी त्याला भेटण्याकरिता हैदराबादला गेली. तिथेही दर्शनने तिचे लैंगिक शोषण केले.