नागपूर : पुढारी वृत्तसेवा
दोन वर्षापासून महिलेशी अनैतिक संबंधात अडसर असलेल्या तीच्या पतीचा आपल्या मित्राच्या मदतीने सपासप शस्त्राचे घाव घालून हत्या करीत काटा काढला. ही घटना पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठक्करग्राम परिसरात घडली.
गेले आठवडाभर रोज एका हत्येच्या घटनेने नागपूर हादरत आहे. शेरा सूर्यप्रकाश मलिक (वय 32 वर्षे), ठक्करग्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गीतेश उर्फ रजत उके (वय 33 वर्षे), भोजराज मोरेश्वर कुंभारे (वय 32) राहणार पाचपावली अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पाचपावली पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे. दोन वर्षापासून गीतेशचे शेराच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यातूनच अनेकदा दोघांचा वाद झाला. अखेरीस गीतेशने आपल्या मित्राच्या मदतीने शेराचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले आणि यातूनच मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राच्या साहाय्याने महिलेच्या पतीची हत्या करण्यात आली.