HSC Paper Nagpur News 
नागपूर

HSC Paper Leak Nagpur Update | बारावी पेपरफुटीचा महाघोटाळा: 2 जणांना पोलिस कोठडी; अनेक शिक्षक आणि विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर!

या रॅकेटमध्ये गुंतलेल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एका खासगी शिकवणी संचालक आणि एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमध्ये गुंतलेल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

काय आहे प्रकरण?

मानकापूर येथील ‘मुल अकॅडमी’चा संचालक निशिकांत मूल (वय ४०) आणि फरहान फहीम अख्तर (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निशिकांतने परीक्षेच्या सरावासाठी २१ विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता. नागपूर विभागात तब्बल दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असून, या रॅकेटद्वारे प्रत्येकाकडून २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एका सतर्क शिक्षिकेमुळे फुटले 'बिंग'

सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले. परीक्षा सुरू असताना ती विद्यार्थिनी वारंवार वॉशरुमला जात होती. पर्यवेक्षक शिक्षिकेने दिलेल्या सतर्कतेमुळे तिची तपासणी केली असता, तिच्याकडे मोबाईल सापडला. त्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरून पेपरफुटीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

रॅकेटचा मास्टरमाईंड कोण?

तपासात असे दिसून आले आहे की, शिक्षण मंडळाशी संबंधित एका व्यक्तीकडून परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका निशिकांतला मिळायची. त्यानंतर तो ती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे प्रसारित करायचा. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

पोलिसांची कारवाई

सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आता हे रॅकेट नागपूरसह इतर शहरांतही सक्रिय आहे का आणि यामध्ये आणखी किती शिक्षक व अधिकारी सामील आहेत, याचा सखोल शोध पोलिस घेत आहेत. शिक्षण मंडळाच्या एका संशयित व्यक्तीवरही पोलिसांची करडी नजर आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT