नागपूर : पुढारी वृत्तसेवा
काही महिन्यांपूर्वी झालेल्या खापरखेडा येथील गोळीबार प्रकरणाचा सूड म्हणून दोन दुचाकीवर आलेल्या चार संशयित आरोपींनी गोळ्या झाडून हॉटेल मालक अविनाश भुसारीची हत्या केल्याची घटना घडल्याचे बोलले जाते. चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मंगळवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेतील संशयित आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांच्या विविध पथकांमार्फत त्यांचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कुख्यात शैलेश उर्फ बंटी विनोद हिरणवार यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. साहिल उर्फ सोनू दिलीप शेंद्रे (वय 29) ,शक्ति राजेश यादव (वय 27), सौरभ उर्फ मोन्या प्रवीण काळसर्पे (वय 30), ऋत्विक धीरज हिरणबार (वय 25), अंकुश बकरा, बाबू हिरणवार, सिद्धू व त्याचे दोन साथीदार अशी इतर मारेकऱ्यांची नावे आहेत.
या विषयी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रामनगर चौक परिसरात असलेल्या सोशा कॅफेचा संचालक मृतक अविनाश राजू भुसारी (वय 28) राहणार प्रगती नगर आणि त्याचा मित्र आशिष यादव हे दोघे लक्ष्मीभुवन चौकात आईस गोला खाण्यासाठी गेले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ते परत आले आशिष कॅफेत गेला तर अविनाश हा कॅफेजवळ आईस गोला खात बसला होता. याच दरम्यान दोन मोटरसायकलवर शक्ती आणि इतर चारजण आले. त्यांनी अविनाशच्या दिशेने दोन पिस्तुलातून गोळीबार केला. एक गोळी अविनाशच्या पोटात घुसल्याने तो खाली कोसळला नंतर शक्ती व त्याच्या साथीदारांनी विनाशच्या डोक्यात पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याने घटनास्थळीच अविनाशचा मृत्यू झाला.
लगेच मारेकरी पसार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंगळवारी सायंकाळी एका मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. खापरखेडा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तस्कर राष्ट्रपाल उर्फ मंत्री व त्याच्या टोळीला अटक केली. पोलिसांनी 7 अग्निशस्त्र व दहापेक्षा अधिक काडतूस जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रपालची चौकशी केली असता बंटीने तीन पिस्तूल खरेदी केल्याची माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी याबाबत बजाज नगर व गुन्हे शाखा पोलिसांना सतर्क केले. मात्र पोलिसांनी बंटी व शक्तिविरूद्ध ठोस कारवाई न करीत त्यांना तडीपार केले. तडीपार असतानाही दोघे नागपुरात आले व अविनाशचा गेम केला असे बोलले जाते.
अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना 15 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.20 ते 1.30 वाजता घडली. निंबस कॅफेसमोर सोशा रेस्टारेंट मालक अविनाश राजू भुसारी (वय 28) वर्ष हे निंबस कॅफेचे मॅनेजर आदित्य याच्यासोबत दोघे बसून आईस गोला खात असताना 4 संशयित आरोपी इसम हे मोटरसायकल तसेच पांढऱ्या रंगाची मोपेड यावर डबल सीट बसून आले व त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून अविनाश राजू भुसारी (वय 28 वर्षे) यांच्यावर गोळीबार केला व तिथून पळून गेले. गंभीर जखमी अविनाश यांना तातडीने खासगी इस्पितळ वोकहार्ट हॉस्पिटल येथे भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतकाचे वडील राजू भुसारी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.