Horiba Semi-conductor Project
बुटीबोरी येथील कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर Pudhari Photo
नागपूर

होरिबाचा सेमी कंडक्टर प्रकल्प नागपुरात व्हावा : उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भारत आता सेमी कंडक्टरचा हब ठरला आहे. जपानच्या होरीबा कंपनीने बुटीबोरी येथे सेमिकंडक्टर प्रकल्प उभारावा, त्यासाठी राज्य सरकार सदैव तत्पर असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. होरीबाचे नागपूर येथील सुविधा केंद्र हे आदर्शाचा मापदंड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान,नागपुरातील उद्योग वसाहतींमध्ये विविध औद्योगिक कंपन्या आल्यास स्थानिक रोजगारास चालना मिळेल. विदर्भाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल आहे. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले.

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जपानस्थित होरीबा या कंपनीच्या सुविधा केंद्राच्या कोनशीलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. बुटीबोरी येथील कंपनीच्या परिसरात आयोजित केलेल्या या समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कंपनीचे अध्यक्ष आत्सूशी होरिबा, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. जय हाकू, कॅार्पोरट ऑफिसर डॉ. राजीव गौतम, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. या प्रकल्पामुळे भारतातील सुमारे 30 हजार डायग्नॉस्टिक लॅबना महत्त्वाची उपकरणे पुरवली जाणार आहेत. तपासणी प्रयोगशाळेसाठी लागणारे सोल्यूशन्स आणि इलेक्ट्रॉनिक चिप्सवर होरीबा कंपनीचे कार्य असून वैद्यकीय क्षेत्रासाठी ही निर्मिती महत्वाची आहे. सुमारे 12 एकर जागेवर उभारलेल्या या कंपनीचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी माझ्या हस्ते करण्यात आले. अत्यंत युद्धपातळीवर हे काम कंपनीने पूर्ण केल्याचा आनंद आहे. नागपूर हे आता केवळ आकर्षक महानगरच नव्हे तर पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेले महानगर झाले आहे. कंपनीच्या भविष्यात लागणाऱ्या प्रकल्पांना जी जागा व पायाभूत सुविधा लागेल ती उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT