नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाविकास आघाडी कायम राहील की नाही याची शंका सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही स्थानिक नेत्यांनाच दिले असल्याचे सांगून पुन्हा गोंधळ वाढविला आहे. त्यामुळे नागपूर महापालिका आणि नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडी तुटणार असल्याचे जवळपास उघड झाले आहे.
नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी यासाठी आधीपासूनच काँग्रेसचे नेते आग्रही आहेत. शिवसेनेचे दोन आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षाची शहरात राजकीय ताकद नाही असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. प्रभागनिहाय लढतीत मोठ्या पक्षाना फायदा होतो. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. महाविकास आघाडी झाल्यास सुमारे 50 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेसाठी सोडाव्या लागतील. दीशडेपैकी पन्नास जागा सोडण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. मात्र वरूनच आघाडी झाल्यास सर्वांचाच नाईलाज होण्याची शक्यता होती. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक नेत्यांना याचे अधिकार दिल्याने अनेकांनी तूर्त सुटकेचा श्वास घेतला आहे.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सातत्याने स्वबळावर तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकांमध्येही आघाडीबाबत शंका व्यक्त केली गेली. उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये येऊन स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यावेळी मोठी टीका झाली होती. उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच यास विरोध दर्शवला. संजय राऊत यांनी घोषणा करण्यापूर्वी स्थानिक राजकीय परिस्थिती जाणून घ्यायला हवी होती, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आधी चर्चा करायला पाहिजे होती असा सबुरीचा सल्ला त्यांना देण्यात आला.यापूर्वीची महापालिकेची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढली. जिल्हा परिषद मात्र एकत्रित लढली आणि सत्ताही मिळविली होती.