नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार दिनांक ३० मार्च रोजी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांचे नागपुरात भव्यदिव्य स्वागत करा, अशी सूचना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना केल्या.
पंतप्रधानांच्या स्वागताच्या तयारी संदर्भात नागपूरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची महाल येथील शिक्षण सहकारी बँकेच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गांवरून जाणार आहेत, त्या प्रत्येक मार्गावर आणि ४७ चौकांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी एकत्रित यावे. केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्तेच नाही तर नागरिकांनाही निमंत्रण देऊन स्वागतासाठी आणावे. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा, चौकात सजावट, स्वागताचे फलक तसेच गुढी उभारून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वागत करा, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी निवनिर्वाचीत आमदार संदीप जोशी यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. संदीप जोशी, आ. चरणसिंग ठाकूर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार राजु पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, पक्षाचे नागपूर शहर संघटन महामंत्री विष्णु चांगदे, माजी महापौर अर्चनाताई डेहनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.