नागपूर : नागपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प व वाघांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. यातील काही वाघ अन्य राज्यात स्थलांतरीत करण्याबाबत केंद्र सरकारशी विचार विनिमय करुन निर्णय घेऊ, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी (दि.२७) सांगितले. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पारशिवणी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे वाघाच्या हल्ल्यामुळे भितीच्या सावटाखाली असलेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागाच्या प्रधान वनसंरक्षक शोमिता विश्वास, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास राव, प्रविण चव्हाण, श्रीलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल म्हणाले, ज्या कुटुंबाने वाघाच्या हल्ल्यात आपले कुटुंबीय गमावले आहे. त्यांना तातडीने मदत कशी देता येईल? याचा आम्ही विचार करीत आहोत. अधिकाऱ्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करुन आपल्या पातळीवरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची दक्षता घ्यावी. वनक्षेत्राच्या शेजारी असलेल्या गावांना केवळ वाघांची भिती नाही तर अन्य वन्य प्राणांकडून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. याची शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मकता ठेवली पाहिजे, असे राज्यमंत्री ऍड आशिष जैस्वाल यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाघाचे हल्ले वाढले आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भितीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
त्यानंतर कोढासावळी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दशरथ धोटे यांच्या कुटुंबातील सदस्यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली व सांत्वन केले. याचबरोबर त्यांनी पेंच परिसरातील काही गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी एआय, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपण, याबाबत प्रशासनातर्फे लवकरच योग्य ती पावले उचलून शक्य ती कामे लवकर सुरु केली जातील, या शब्दात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांना धीर दिला.