Friend kills friend in Nagpur
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
हेल्मेट व गॅस शेगडी डोक्यावर आपटून मित्राची हत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विहीरगाव येथे उघडकीस आली. अनिल मधुकर पवार (वय 36) राहणार पिंपळगाव जिल्हा यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे, तर राजू महादेव पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.
फरार राजूचा शोध लागल्यानंतरच या हत्येचे गूढ उलगडणार आहे. अनिल हा उमरेड मार्गावरील त्रिमूर्ती बारमध्ये काम करीत होता. राजू एका हॉटेलमध्ये काम करतो. घरमालक मनोज शंकरराव दळणे (वय 44) हे शेती करतात. त्यांचे विहीरगाव येथे घर आहे.
15 मे रोजी त्यांच्याकडून राजू याने खोली भाड्याने घेतली. पाच दिवसानंतर राजू तेथे राहायला आला. दरम्यान अनिलने कुलर घेण्यासाठी मनोज यांना पैसे उधार मागितले. त्यांनी गरज म्हणून कुलर घेऊन दिला. त्यानंतर अनिल हा एक जून पासून कामावर गेला नाही.
दरम्यान, राजू व अनिलमध्ये वाद झाला. राजूने संतापाच्या भरात गॅस शेगडी डोक्यात घालून अनिलची हत्या केली. त्याच्या चेहऱ्यावर कापड झाकले आणि घराला कुलूप लावून पसार झाला. घरातून दुर्गंधी येत असल्याने पोलीस पाटील प्रमोद कोंगे यांनी घरमालक मनोज यांना संपर्क साधून ही माहिती दिली.
मनोज दळणे व परिसरात राहणारे पोलीस राजू खोरगडे यांनी दरवाजा तोडला असता कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. हुडकेश्वर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रश्मीता राव, सहाय्यक पोलीस उपायुक्त नरेंद्र हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा पोहोचला. पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी राजूचा शोध सुरू केला आहे.