नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक, प्रसिद्ध उद्योजक विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव उपाख्य भैय्यासाहेब मुंडले यांचे मंगळवारी (दि.३०) रात्री ८.३० वाजता हृदयविकाराने दु:खद निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. आज (दि.३१) दुपारी १२ वाजता अंबाझरी घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंडले यांची नागपूर विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योजक व धरण बांधकाम तज्ञ, समाज सेवक, धरमपेठ शिक्षण संस्था, दी ब्लाइंड रिलिफ असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन तसेच नरकेसरी प्रकाशनचे माजी अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष अशी विविधांगी ओळख होती. निखिल मुंडले हे त्यांचे सुपुत्र आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रभाकरराव मुंडले यांच्या निधनानंतर शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि ज्येष्ठ उद्योजक, समाजसेवक भैयासाहेब उपाख्य प्रभाकरराव मुंडले यांच्या निधनाने सामाजिक दातृत्त्व जपणारे, मनाने अत्यंत संवेदनशील असलेले एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले. नागपुरातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.