नागपूर : हवेत उडणारे विमान अनेकदा आकाशात बघितले, आपण रोज भांडीकुंडी,स्वयंपाक इतकेच काम करतो. जवळ पैसे नाहीत. साधे रेल्वेत बसलो नाही मग विमानाचे स्वप्न तर दूरच नाही का ? अशा विचारात असलेल्या 20 घरकाम करणाऱ्या महिला आता उद्या सकाळी पावणेआठच्या विमानाने नागपुरातून थेट मुंबईला उड्डाण करणार आहेत. चौपाटीवर फिरणार आहेत. हॉटेल ताजमध्ये चहापान आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे त्यांना साडीचोळी देऊन सन्मान आणि जेवणही दिले जाणार आहे. इतकेच नव्हे तर अभिनेता अशोक सराफ, मकरंद अनासपुरे भारत गणेशपुरे अशा काही चित्रपट, टीव्हीवर दिसणाऱ्या कलावंतांच्या भेटीगाठी देखील त्या घेणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील या महिला आज विशेष वाहनाने नागपुरात आल्या. टेकडी गणेशाचे दर्शन घेतले. महाराजबाग प्राणिसंग्रहालय बघितले. आता उद्यापासून तीन दिवस त्या मुंबईत आहेत. परतीचा प्रवास रेल्वेने केला जाणार आहे. अर्थातच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील या महिलांसाठी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या रसिकाश्रय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हे सर्व शक्य झाले आहे. जीवाची मुंबई श्रमिकांसाठी आनंदवारी असा हा उपक्रम गेल्यावर्षी वयोवृध्द,ज्येष्ठांसाठी राबविण्यात आला. यावर्षी त्यांनी या महिलांची निवड केली. दारूबंदीसाठी स्वामिनी दारूबंदी अभियानातर्फे त्यांनी विधिमंडळावर यापूर्वी धडक दिली होती. या महिलांचा आज नागपुरात देवता लाईफ फाऊंडेशन, दि. धरमपेठ महिला बँकेच्या वतीने भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला.
यावेळी बँकेच्या अध्यक्षा नीलिमा बावणे, सीईओ चंद्रशेखर वसुले, देवेंद्र गणवीर,प्रा विलास तेलगोटे, स्नेहल चौधरी यांच्यासह इतर सहकारी, बँकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. सुमन ढोके( 65) , सुनिता वाठ (60),सुरेखा बावणे, अनसूया बावणे (46), शोभा वाहिले (60) या महिलांनी यावेळी आपल्या आयुष्यात कधी रेल्वेतही बसलो नाही विमान तर दूरच राहिले. नागपुरातील अशा टोलेजंग इमारती देखील बघितल्या नाहीत अशी कबुली दिली. या सन्मानाने त्या भारावून गेल्या होत्या.