नागपूर : प्रसिध्द दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नागपुरातील धन्योलिस्थित रामकृष्ण मठात घडली.
धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष उबाळे हे मूळचे नागपूरकर असून ते प्रतापनगरात वडिलोपार्जीत घरी राहत होते. सुमारे २५ वर्षांपूर्वी दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. अनेक टिव्ही मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच काही चित्रपटात स्वत: भूमिका केली. त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रतापनगरातील वडिलोपार्जीत घर विकले. आईवडिलांसह ते मुंबईत राहायला लागले. स्वबळावर काही टिव्ही मालिकांचे दिग्दर्शन केले.
याकाळात त्यांनी कर्ज घेतले. मात्र, त्यांचा व्यवसाय मंदावला आणि कर्जाची सव्याज रक्कम वाढत गेली. त्यामुळे ते चिंतेत होते. दोन दिवसांपूर्वी ते मुंबईवरुन नागपुरात आले. धंतोलीतील रामकृष्ण मठात त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी म्हणून काम करतो. भावाला भेटण्यासाठी ते रामकृष्ण मठात गेले. भावाच्या विनंतीवरुन दोन दिवसांपासून तेथीलच एका खोलीत मुक्कामी होते. शनिवारी दुपारी दीड वाजता जेवणानंतर विश्रांती घेत असल्याचे भाऊ सांरगला सांगून खोलीत गेले. सायंकाळी चहा घेण्यासाठी भाऊ आला नाही म्हणून सारंग त्यांच्या खोलीत गेला. तर त्याला खोलीत भाऊ आशिष गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. धंतोली पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल होत आकस्मिक मृत्यूची नोंद केली.