CM Devendra Fadnavis Compensation Announces
नागपूर: गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) घोषित केले.
या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास काटली गावातील सहा मित्र फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले. महामार्गावरून जात असताना आरमोरीकडून गडचिरोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्षणात रक्ताचा सडा पडला आणि मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. या दुर्घटनेत पिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दिशांत दुर्योधन मेश्राम (१५) आणि तुषार राजेंद्र मारबते (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पिंकू आणि तन्मय यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिशांत आणि तुषार यांनी रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण सोडले. गंभीर जखमी असलेल्या क्षितीज तुळशीदास मेश्राम आणि आदित्य धनंजय कोहपरे यांना तातडीने लॉयड मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर निर्दयी ट्रकचालक ट्रकसह फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.