नागपूर : राजेंद्र उट्टलवार
नागपूर शिक्षण विभागातील कोट्यवधींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती रोज सतत वाढत असून 2014 ते 2024 या कालावधीत 35 ते 40 लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून घेत बनावट कागदपत्रे, सोमेश्वर नैताम नामक सेवानिवृत्त आणि हयात नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरींचा नियुक्ती पत्रासाठी वापर झाला. ते लक्षात घेता आता सुमारे 580 शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींवर टांगती तलवार आली आहे. राज्य सरकार, शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे शिक्षण संघटनांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यातील अनेक बोगस शिक्षकांचे संसार आता उघड्यावर येण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते, माजी आमदार नागो गाणार यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण करण्यात आली असून नियुक्ती पासून तर वेतन निश्चिती पथक, वेतन जमा करेपर्यंतचा सखोल तपास झाल्यास हा शेकडो कोट्यवधींचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे. तूर्तास नागपूर पोलिस या प्रकरणी तपास करीत असले आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती असून या संदर्भात एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशीही मागणी पुढे आली आहे.
दुसरीकडे शिक्षण विभागातील घोटाळा, बोगस कागदपत्रे नियुक्ती प्रकरणी अधिक्षक निलेश मेश्राम या सुत्रधाराची एक ऑडिओ क्लिप देखील सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्याने या घोटाळ्यात आणखीही तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे. यात तुझे काम होऊन जाईल, जितका उशीर होईल ते आपल्यासाठी चांगलेच आहे. अर्जंट काम आहे. 10 हजार तातडीने एका नंबरवर टाकण्यास सांगितले गेले आहे. अर्थातच या क्लिपची चौकशी झाल्यावरच खरे खोटे समजणार आहे. तूर्तास मुख्याध्यापक गोपाल पूडके यांच्या संदर्भातील एका तक्रारीवर पोलिस तपास सुरू असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.
निलेशच्या नातेवाईकांच्या नावावर तीन शिक्षण संस्था असल्याची माहिती पुढे आली असून त्याने या माध्यमातून जमवलेल्या संपत्तीची देखील आता चौकशी होण्याची शक्यता बळावली आहे. अर्थातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या शिक्षक नियुक्ती घोटाळ्यांची व्याप्ती जरी मोठी असली तरी आता तपासात, कारवाईत राजकीय इच्छाशक्तीची कसोटी लागणार आहे.
नागपुरातील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षक निलेश मेश्राम यानेच ही बोगस कागदपत्रे तयार करून दिली असल्याने सदर पोलिसांनी निलेश मेश्रामसह आणखी तिघांना अटक केली असून अटकेतील संशयित आरोपींची संख्या पाच झाली आहे. शिक्षण उपनिरीक्षक संजय शंकरराव सुधाकर (वय 53), लिपिक असलेला सुरज पुंजाराम नाईक (वय 40) अशी इतर दोघांची नावे आहेत. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना यापूर्वीच गडचिरोली येथून अटक करण्यात आली. दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली गेली. चौकशीत नीलेश मेश्राम याने बनावट नियुक्ती पत्रासाठी पराग पुडके यांच्याकडून 10 लाख रुपये घेतल्याचे पुढे आले आणि पोलिस इतरही आरोपीपर्यंत पोहोचले. शिक्षण विभागातील इतरही अधिकाऱ्यांचे आता या कारवाईनंतर धाबे दणाणले आहेत.