आमचे शेअर्स जोरात, त्यांना आता जनताच धक्का देणार : एकनाथ शिंदे Pudhari File Photo
नागपूर

आमचे शेअर्स जोरात, त्यांना आता जनताच धक्का देणार : एकनाथ शिंदे

शिंदे म्हणाले, मला धमकी नवी नाही...!

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. डान्सबार बंद केले तेव्हाही खूप धमक्या आल्या. ठार मारण्याच्या धमक्या आल्या, प्रयत्नही झाले, पण मी घाबरलो नाही. नक्षलवाद्यांनीही धमकी दिली होती, मात्र त्यांच्या धमक्यांना मी भीक घातली नाही. गडचिरोलीत पहिला औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचे काम मी केले. रोज माझा विरोध करणारे, जळणारे एक दिवस स्वतः जळून खाक होतील असे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला ठणकावले. ठाकरे गटातील विदर्भातील अनेक पदाधिकारी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्यासोबत आहे असा दावा त्यांनी केला.

दहावी पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे. वोहरा कमिटी रिपोर्टविषयी छेडले असता त्याची मी माहिती घेत आहे असे सावध उत्तर दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच एसटीमध्ये महिलांना 50% सवलतही बंद केली जाणार नाही. पालकमंत्र्यांसंबंधीचा तिढा लवकर सुटेल असे सांगितले.

महायुतीचे सरकार राज्यात येण्यामध्ये सर्वांचेच योगदान आहे. लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, साधू-संत, संघ परिवार आणि सर्व लोकांनीच काम केले. नरेंद्र महाराजांचे मोठे अधिष्ठान आहे, त्यांच्या लोकांनीही आमच्या महायुतीच्या पाठीशी राहून सहकार्य केल्याचे स्पष्ट केले. अमित शहा यांची उद्या झोनल कौन्सिलची बैठक होणार असल्याची माहिती त्‍यांनी दिली.

काही लोक धक्का पुरुष झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना धक्का देऊन बाहेर बसवले आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला आणि बाळासाहेबांचा विचार सोडला. पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून पक्षाबाहेर काढणाऱ्या नेत्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि आमच्यावर विश्वास दाखवत आहेत. शिवसेनेतील धक्का पुरुष, धक्का तंत्र ..! संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

शिंदे म्हणाले, शेवटी शेअर बाजारात ज्या शेअरची पत असते, तेच शेअर लोक खरेदी करतात. तशीच आमची शिवसेनाही आहे असा चिमटा शिंदे यांनी काढला. आज मी विदर्भ दौऱ्यावर आहे. दोन मेळावे आयोजित केले आहेत. निवडणूक प्रचारात मी सांगितले होते की, देवेंद्रजी आणि मी 200 जागा जिंकणार 232 जागा आम्ही जिंकल्या. मी सांगितले होते निवडणूक जिंकल्यानंतर मी पुन्हा येईन. त्या अनुषंगाने आजचा हा विदर्भ दौरा आहे. निवडणूक जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. त्याच अनुषंगाने लोकांचे आभार मानण्यासाठी मी विदर्भात आलो आहे. कोस्टल रोड संदर्भात बोलताना मी स्वतः या विषयात लक्ष घालेन. मुंबई महापालिका आयुक्तांशी मी बोललो आहे आणि त्यांना हा विषय गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत याकडे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT